एक कथुली
एक सुरवंट होता,छोटासा पण बरासचा कुरूप.त्याने एकदा एक गुलाबाचे फुल बघितले आणि त्या फुलाच्या लोभस-नाजुक रुपाने तो मोहीत झाला.त्या फुलाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयास करू लागला.पण अचानक एकदा खूप जोराचा वारा आला आणि तो त्या फुलापासुन फार लांबवर फेकला गेला.मनात फुलाची आठवण होती ,मनात प्रेमाची साठवण होती.असाच काळ लोटत गेला ,सुरवंट आपल्याच कोशात लपेटत गेला.फुलाची रंगीत सोबत आठवत कसाबसा जगत राहीला.अशाच एका पहाटे त्याला जाग आली , तो रोमांचित झाला.त्याच्या कुरूप शरीरावर छानसे रंगीबेरंगी पंख आले होते.तो आता हवेत ऊडु शकत होता.आपल्या सर्व ताकदीने तो आकाशात झेपावला आणि उडत उडत फुलाजवळ जाऊन पोहचला.पण फुलाने त्याला ओळखलेच नाही ते आपल्याच कैफात डोलत राहीले ,रंगेल भुंग्यांशी बोलत राहीले.सुरवंटाला खुप वाईट वाटले.तो क्षणभरसुद्धा तेथे थांबला नाही.मनातले कढ रिचवत दूर निघून गेला.अतिव दुःखात झुरत राहीला.एका बेसावध क्षणी निवडुंगाशी टकरावला.त्याचे सुंदर पंख पार फाटून गेले.शरीरात काटे घुसून ते रक्ताने माखले.तो मातीत पडला आणि माती होऊन गेला.पावसाच्या पाण्यात माती भिजली आणि एके दिवशी त्याच मातीत एक गुलाबाचे रोपटे ऊगवले.त्यावर एक फुल फुलले पण कुणालाच कळले नाही ते इतके लाल लोभसवाणे कसे झाले..





