Monday, February 1, 2016

साबण फुगे

मुक्ते ,
साबण पाण्याच्या फुग्यांचा खेळ प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी खेळलेला असतोच.सप्तरंगी रंगात न्हाऊन निघालेले ,तलम कायेचे हे असंख्य फुगे हवेत तरंगत आपल्याच नादात हवेच्या तालावर जेव्हा वरवर जाताना दिसतात तेव्हा ते बघताना खूप मजा येते नाही ? आणि आजुबाजूला असलेल्या निसर्गाची त्यामधून पडलेली प्रतिबिंबं ,ती तर फोटोंहूनही सुंदर ,अप्रतिम !!
माणसाचं जीवनही असच आहे , त्यात अनेक रंगछटा आहेत पण त्या बघता यायला हव्यात ,साबण फुग्यांसारख्या ,मनापासून पण त्रयस्थपणे ,साक्षीभावाने.

त्यातलाच एक रंग आहे प्रेमाचा.गुलाबी ,मृदु मुलायम , हवाहवासा वाटणारा ,हूरहूर लावणारा ,जगवणारा-

काय गुणगुणतेयस ? 

"प्रेमा तुझा रंग कसा
किरमिजी ढग जसा

प्रेमा तुझा स्पर्श कसा
मऊ मऊ ससा जसा

प्रेमा तुझा गंध कसा
दरवळता चाफा जसा

प्रेमा तुझा बोल कसा
अबोलता अश्रु जसा

प्रेमा तुझा चेहरा कसा
डोळ्यातला भाव जसा

प्रेमा जरा येशील ना
     मनी दाटशील ना
ओढाळश्या लयीतून
     गात्री भिनशील ना"

वा छान !

आणि बरं कां ,ते अचानक भेटतं -अगदी या गाण्यातलं आहे तसं,

"असं कसं , 
चालताना कुणी आपलस भेटतं रे
"असं कसं ,
बोलताना कुणी आपलसं वाटत रे
"असं कसं ,
ह्रदयाच्या झाडावरी कुणी करतं
प्रेमाचं घरटं रे ...
.....
कुणासाठी जगायच क्षणभरा ,ठरे तरी
"
मुक्ते ,फुगे तर गेलेच ,whatsapp च्या "graphity wall " वर.असू दे कुणीतरी वेडे असणारच त्यांचातलं जग तन्मयतेने बघणारे !!