Monday, May 16, 2016

समईचा स्पर्श

हे राजन् ,
ईश्वराचे सारेच मार्ग विलक्षण असतात पण ते दुष्ट मात्र कधीच नसतात.
समईचा स्पर्श वा-याला होऊन तो शालिनतेने उजळावा तसेच 
आपल्या पिशवीभर अंधारात आपल्याच अस्तित्वाची एक ज्योत निरंतर तेवत असते. 
तिला हवं असतं एक आलिंगन, आतुन दाटलेल्या प्रेमाचं. 
हीच जाणिव थोडी व्यापक बनवली कि त्यातून साकार होते ती करूणा.जिथे सारे आभास संपतात.
पण एक आकांत उभा राहतो मागे पुढे.तो ओलांडताना आपसुक सिद्ध होतो तो असतो स्वानुभव.
नश्वरतेच्या पायावर उभे असलेल्या या जगात माणूस सुखाकडे धावत असतो 
आणि आत्मवंचना देणा-या आरशात स्वतःला पाहत असतो.
पण तरीही काहींना हीच जाणिव सतत बोचणी देत असते 
एका वेगळ्या आर्वतनात ,एका वेगळ्या मितीत.
किंमत असते स्वतःचेच अस्तित्व-

"नको व्हाया होती तेजाची जाणिव
आता वादळणे नशिबात ।
सुरवेड्या गायी उधळती धुळ
तैसाच उफाळ आता माझा।।"

Tuesday, May 10, 2016

सैराट

"याड लागलं रं, याड लागलं रं
रंगल तुझ्यात ,याड लागलं रं
वास येई साथ देई कस्तुरीचा
चाखलिया वारं गोड लागलं रं
       चांद भासतो,दिसाच मावळाया लागलं ...ऽऽऽऽऽ
       आस लागली मनात कालवाया लागलं......ऽऽऽऽऽ
याड लागलं रं, याड लागलं रं........"

-- नक्षत्रे ,कोसळणारी ,अगम्य धुंदावून सोडणारी, आस आहे प्रत्येक क्षणाक्षणात आणि तू आहेस ,तूच आहेस इथे तिथे सगळीकडे.छोट्या ,छोट्या आठवणींच्या कड्यातून ,अलंकृत ,झुलणा-या नादावणा-या पुलकीत
 सुगंधातुन तूच आहेस.दिवसरात्रीच्या मध्यावरंच्या ,प्राणांना हेलावून सोडणा-या ,काहूर लावणा-या ,चंपई उजेडातही तूच आहेस .....

"उलगना ,सुलगना जाळ आतल्या आतला
दुखणं हे देखणं गं एकलचं हाय साथीला
काजळीला उजळना पाजळून या वातीला
चांदणीला आवतानं धाडतोया रोज रातीला

झोप लागना सपान 
        ...जागवाया लागलं
पाखरू कसं आभाळ 
       ...पांघराया लागलं"

--जाणीव , अगाध शांततेतून झुळकणारी,
नितांत सुंदर आरस्पानी ,स्वसंवेद्य गुणगुण,क्षणाक्षणातं ओथंबणारी ,ह्रदयस्थ येउन अतिदूर जाणारी ,वेड लावणारी कधी ,न संपणारी केवळ आणि केवळ आर्ततेतूनच साकार होणारी ,करूणाष्टकांतून आकळणारी ,सारे भेद मिटवणारी ...फक्त जाणीव

याड लागलं रं, याड लागलं रं.....ऽऽऽ...

 

पडछाया

हे राजन्,


प्रश्न अस्तित्वाचा नाही.ते आज आहे उद्या नसेल.प्रश्न आहे तो लौकीकावर असलेल्या पारलौकीकाच्या पडछायेचा.
युगानुयुगे माणसाला भेडसावणा-या पण कधीच हाती न आलेल्या कोड्याचा.
वेदना समोर उभी ठाकली आणि माणसाच्या मनात 'परमेश्वर' जन्मला.
तो परमदयाळू आहे तो मला सर्व वेदनांपासून वाचवील अशी तारणहार प्रतिमा त्याने बनवली 
आणि हा मनःबुद्धीसंस्कार पिढ्यानपिढ्या अगणित मनांवर कोरला गेला ,पुढेही राहील.
असंख्य चेतन-अचेतन वस्तुमात्र रोज या ना त्या कारणाने वेदनाव्यथित होत असताना , 
हे देवा माझं भल कर (मनाने चांगले असतील) तर इतरांचही भलं कर 
अस मागण मानण्यातील निर्रथकता कधीच लक्षात न येणे इतकी बधिरता आणण्याचे सामर्थ्य याच 'परमेश्वरात' आहे.

"आभाळ झिरपते भरलेल्या माठात ।

अन् निळा माठ बघ भरला आभाळात ।।

आभाळ पलिकडे माठ फुटे हा इकडे ।

हा वेडा जमवी आभाळाचे तुकडे ।।"


Mother's Day

थकलेल्या पांथस्थाला सावली देणा-या वृक्षांना..

तृर्षात कंठाला तृप्त करणा-या तळ्यांना..

चिवचिवाट करत जागे करणा-या निरागस चिमण्यांना..

पाठीवर मायेची पाखरण करणा-या थरथरत्या हातांना..

काही ओळख नसताना जवळ बसून आधार देणा-या व्यथालयातील चेह-यांना..

सूरांची जादू हलकेच ऐकवून धुंदकरणा-या अनामिक रानपक्ष्यांना...

सर्व वेदना संपवून चिरनिद्रा देणा-या मृत्यूला ....

चराचरात भरून असलेल्या प्रकट अप्रकट ममत्वाच्या स्पर्शांना ..

बुद्धीपूर्वक सादर प्रणाम!

आरसा

आरसा ,एक आभासाची भूल.गुंगवून फसवणारा. 

दिसणा-या प्रतिमेला खरे मानून ,आत्मवंचनेची थोडीही जाणीव न होउ देता अडकवणारा.

पण काळ मात्र सर्व आभासांना कधीतरी चूड लावतोच.

मग खरी प्रतिमा दिसते.

हे एकदा समजले की प्रतिमा विभ्रमांचा भुलभुलैयांचे खेळ प्रत्यक्षात दिसू लागतात-आरशात नाही.