Monday, May 16, 2016

समईचा स्पर्श

हे राजन् ,
ईश्वराचे सारेच मार्ग विलक्षण असतात पण ते दुष्ट मात्र कधीच नसतात.
समईचा स्पर्श वा-याला होऊन तो शालिनतेने उजळावा तसेच 
आपल्या पिशवीभर अंधारात आपल्याच अस्तित्वाची एक ज्योत निरंतर तेवत असते. 
तिला हवं असतं एक आलिंगन, आतुन दाटलेल्या प्रेमाचं. 
हीच जाणिव थोडी व्यापक बनवली कि त्यातून साकार होते ती करूणा.जिथे सारे आभास संपतात.
पण एक आकांत उभा राहतो मागे पुढे.तो ओलांडताना आपसुक सिद्ध होतो तो असतो स्वानुभव.
नश्वरतेच्या पायावर उभे असलेल्या या जगात माणूस सुखाकडे धावत असतो 
आणि आत्मवंचना देणा-या आरशात स्वतःला पाहत असतो.
पण तरीही काहींना हीच जाणिव सतत बोचणी देत असते 
एका वेगळ्या आर्वतनात ,एका वेगळ्या मितीत.
किंमत असते स्वतःचेच अस्तित्व-

"नको व्हाया होती तेजाची जाणिव
आता वादळणे नशिबात ।
सुरवेड्या गायी उधळती धुळ
तैसाच उफाळ आता माझा।।"

No comments: