Thursday, September 24, 2015

कविता


विजेचे फुलं






नाती

काही नाती अशी असतात की त्यांना कशानेही तोलता येत नाही ,मोजता येत नाही.
त्यांची गुढताच इतकी अफाट असते की एकदा आत शिरल्यावर तुम्ही रस्ता विसरुन जाता 
आणि चकवा लागल्यागत भिरभिरत राहता.
आणि हे हरवणे अगदी हरखुन जाण्यासारखे असते.
देवाघरची माणसे देवाकडे लवकर निघून जातात.
कधी कधी ओळींनीही निघून जातात.आपण राहतो मागे भग्न देवळातल्या पुजा-यासारखे.
त्यांच्या आनंदनिधानांशी असलेले तुमचे नाते हे देखील असेच अनाकलनीय.
अशा आभासमोगरी सुवासाच्या आठवणी जाग्या झाल्या की कल्पनेने दु:खाचे संध्यावस्त्र पांघरून नाहीसे व्हावे -एका चिमुकल्या बाळमुठीत.कारण बालकांनी केलेल्या प्रार्थना देवाजवळ हमखास जावून पोहचतात.


" Baby knows all manners of wise words ,though few on earth can understand 
their meaning.It is not for nothing that he never wants to speak.
The one thing he wants is to learn mother's words from mother's lips.
That is why he is so innocent"

कविता


Tuesday, September 22, 2015

आकांताचे जगणे

माणसाने रूढार्थी असणे हेच बरे.परंपरेविरूध्द जाणे सगळ्यानांच जमत नाही आणि तशी काही अटही नसते, नसावी.
अनुभवसिध्द तुकाराम सांगतो -
"ओंकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।।
अकार तो ब्रम्हा ,ऊकार तो विष्णू । मकार महेश जाणियेला ।।
ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न । तो हा गजानन मायबाप ।।"
पण पुराणेषुपरंपरा कुणाला कुणाचा बाप बनवेल काय सांगावे? असो.
आकांताचे जगणे कुणाच्याही वाट्याला येवू शकते ,येतेही पण तुकारामासारखा एखादाच त्यातला गूढार्थ जाणू शकतो.पण काहींना मात्र ह्या निळाईचे वेड लागते ,नियतीच्या ह्या जीवघेण्या खेळाचा नाद जडतो.मग -
'पुन्हा पुन्हा मरण । घरी दारी बाहेर ...शयनी । सर्व ठिकणी ' याखेरीज गती उरत नाही.
अशा अवस्थेत जगण्या-याचा एका निराळ्या अर्थाने शुभाशुभाचा किनारा फिटत असतो.त्याच्या लेखी मंगल -अमंगलाची लेबले ,रद्द केलेल्या नोंटासारखी कवडीमोल झालेली असतात.-सारेच निरपेक्ष होते ! सा-याच भासचक्राचा भेद होतो अन् उमजू लागते-
"सावल्यांच्या पल्याड असा एक देश 
जिथला वेष नको उतरायला ,चढवायला"
किंवा ..
" हा प्रश्न जिवाला छळतो
टिचलेले बिल्वर हसती
कोणत्या फुलातून गळते
कोणत्या फुलाची माती?"

चेहरा

प्रत्येक चेह-यात एक आभा असते ,मनातल्या किरणांची -अभाव-विभावांची ,कट-विकटांची ,सुख-दु:खांची.
आणि तोच तर खरा चेहरा असतो.एरवी माणसे मुखवटे पांघरून स्वतःलाच फसवत असतात.
पण काय नवल? माणसाला दोन अवयवांचे प्रत्यक्ष दर्शन घडत नाही ,चेह-याचे नि पाठीचे.
म्हणजे माणूस स्वत:पुरता बिनचेह-याचा असतो.अनुभवाने अलिप्त असतो.
आरश्यात जरी तो पाहता आला तरीही ते प्रतिबिंबच असते आणि काठावर पाणी पिताना सिंह जसा त्याला दुसरा सिंह समजून त्यावर झडप घालून स्वतःचीच फसवणूक करतो तेच आपणही करत असतो.
फरक एवढाच की श्वापद निष्पाप असते आणि आपण हुशार असतो.
या आत्मप्रतिबिंबाच्या मोहातून बाहेर पडणारे फारच विरळे.असो.
एखाद्या ज्ञानेश्वरालाच हे कसे काय गवसते ?-

"दर्पणी पहाता रूप न दिसे वो आपुले ।
बाप रखुमादेवीवरू मज ऐसे केले ।।"

कथुली


Tuesday, September 8, 2015

पुनवेचा चंद्रम