Monday, November 28, 2016

मोर नाचरा हवा

हे राजन्,
फरक असावा पण फारकत असु नये.
एक वेळ कापले तरी चालते कारण ते पुन्हा शिवता येते 
पण तोडलेले कधी जोडता येत नाही हे ध्यानात असु द्यावे.
माणसं वास्तवता आणि दैवत्व , चैतन्य आणि शरीर यात 
नेहमीच अंतर मानीत आली आहेत.
तत्वार्थ देखणेपण जोपर्यंत नजरेत उतरत नाही तोपर्यंत हे उमजणे कठीण आहे 
की तसे अंतर नाही.चिखलाच्या अस्तित्वाशिवाय कमळाचा प्रारंभ संभव आहे ? 
विटाळाशिवाय सृजन-संभव आहे? 
आपले पूर्वज ज्ञानी होते तितकेच रसिकही होते.
म्हणूनच पार्वतीच्या अंगावरच्या मळातून गजाननाची विमलमूर्ती निर्माण होऊ शकली.
समर्थांनी ती राजरंगी नाचवली.
आज आईला निरोप देताना काय मागायचे ?
 तिच्या अश्रूंचा अमृतानुभव हवा असेल तर एवढेच म्हणायचे -

"पदरावरती जरतारीचा
मोर नाचरा हवा
गं आई मला ,नेसवं
शालू नवा"

कविता


आता
असाही एक प्रवास , तुला मुक्तांगण
अन् माझी फक्त वाटचाल...

आता
असाही एक प्रवास , तुझे मुकेपण
माझा मात्र आतला आवाज....

आता
असाही एक प्रवास , तुझा मर्मबंध
अन् मला रूद्राक्षसाज ...

आता
असाही एक प्रवास , तुला मारलेली हाक
माझ्या अंगणात मात्र 
चिमणा किलबिलाट .....
चिमणा किलबिलाट ....

कविता


तिने विचारले लाडावून एकदा
नभातले काही तारे देशील का रे ,
आणून मला?
...वेणीत माळून घेण्यासाठी !

तो फक्त हसला कारण त्याला माहीत
होतं ,दूरून 'तारे' दिसणारे ते जवळून 
आगडोंब होते ,
...तिचे कुंतल जळताना पाहणे त्याला कसे
शक्य होते?

त्याने पर्याय दिला-
ह्रदयात साठवलेल्या अगणित गोड
क्षणांची ,तेजस्वी पण शीतल चंद्रकोर
लावशील का भाळी?
....ती खूप छान हसली !

प्राणातले ऊन


हे राजन् ,
लोक दिवसरात्र भजनं म्हणतात ,धूप आरत्या ,यज्ञ ,संकल्प काय काय म्हणून करतात.
पण मरण हे जीवनाचच एक अविभाज्य अंग आहे ," जन्म आणि मृत्यू" 
हे दोन्ही मिळूनच जीवन बनत या गोष्टीचा स्वीकार नाही ! 
खेदाची बाब आहे पण भ्रमाचा हा भोपळा फुटेस्तोवर 99% लोक शरीराच्या या सामान्य 
धर्माचा स्वीकार करू शकत नाहीत.
आपण म्हणतो ,जाऊ नको तिकडं ,कोणीतरी मेलं आहे ,अशुभ आहे.
अरे ,मरणात काय अशुभ आहे? जन्म तो शुभ आणि मरणं अशुभ? 
अशुभ असलं तर दोन्ही अशुभ होणार.शुभं असलं तर दोन्ही शुभ होणार.मुळातच चूक आहे.
मृत्यूचा स्वीकार करण्याच साहस लहानपणापासूनच मुलांना शिकवलं पाहीजे.
मृत्यू आला म्हणजे जीवनाचा अंत झाला असं समजणं चूक आहे.
जन्माबरोबर जीवन सुरू होत नाही आणि मृत्यूबरोबर त्याचा अंतही होत नाही !

"किती खोल आणि किती ओल वक्षी
तुझा सूर्य आणि तुझे चांदणे ?
प्राणातले ऊन प्राणात गेले
तुझ्या सागराची निळी तोरणे ..."

कविता


माझ्या व्यस्ततेत असतो
पैंजणांचा मंद स्वर
अन् बागडे तिथेच
आठवणींची एक खार !

काही वाटांचे नकाशे
काही ठसे ओळखीचे
साक्ष देतात अजून
वळणांवरची झाडे

चिंब पाऊस खट्याळ
पागोळ्यांचा सौदागर
आणि समोर झुलतो
गोल झालरी परकर !

एक संध्यासमयीचा
सूर ह्रदयात थेट
सापडत नाही परी
माझी तुटलेली भेट