Friday, November 15, 2013

ये रे घना ..

मित्रहो ,
आज थोडे बोलूया, पण काय ? सतत वाढत वाढत बकाल होत जाणाऱया मुंबई बद्दल? तुडुंब भरून पसरत जाणारया गर्दीबद्दल ? आस्मानाला भिडणारया पेट्रोल ,डिझेलच्या भावाबद्दल की 'Globalization" च्या दुनियेत हरवत जाणारया नात्यांबद्दल ? नको "its now a part of so called Life ,isn't it ?" .आज जरा भटकून येऊ , अजूनही पावसाच्या काही सरी रेंगाळत् आहेत."आषाढस्य प्रथमदिवसे..." .आठवणी अजूनही ताज्या आहेत.मनातला पाऊस अजूनही थोडा वाजतोय.पण या भटकंतीची एक "condition" मात्र आहे.तिथे नुसतच नाही जायच.तुम्हाला तोंडात बनारसी पान कोंबावे लागेल ,अत्तरांचा सुगंध शिंपून घेण्याची ,हातात गजरा माळण्याची तयारी करावी लागेल किंवा माळून घ्यावा लागेल. .हृदयावर झटके सोसण्याचीही तयारी हवी.चला तर मग. Lets Go.................

उन्मेष ज्यांच्या यौवनाचा ,काहीच ना झाला कमी
प्यायले जे खूप .ज्यांना वाटे,परी झाली कमी
असेल ही फक्त ,त्यांच्याचसाठी "शायरी"
सांगतो इतरांस ,"बाबा , वाचा सुखे "गीताश्वरी"

तो पहा दूरवर एक घोंगवणारा आवाज येतोय .ऐकू येतय एक झकास दिलखेच गाण
 "आला आला वारा संगे ,पावसाच्या धारा 
पाठवणी करा ,सया निघाल्या सासूरा ...".

"हा खेळ सावल्यांचा"  मधल् हे गाण ज्यांना ठाउक असेल त्याना जाणवेल पावसाचे कोसळणे. हा पाऊसही फार मस्तीखोर असतो कधी कधी .कारण याच्या  तर्हा  काही औरच असतात. कशा ? ह्या अशा ...........

जाणतो मी पावसाच्या जीव घेण्याच्या तर्हा
भिजवतो त्यानाच ज्यांचा मक्ख असतो चेहरा
समोरुनी जातात जेथे वसंतसेनांचे जथे
दुष्ट हा पाऊस तेव्हा जवळही नसतो कुठे

पण कधी कधी मात्र हाच पाऊस एक वरदान म्हणून समोर येतो .तुमच्या नजरेला अगदी तृप्त करतो। …
टाळण्यासाठी मला ती पाठमोरी जाहली ,
काय सांगू, ती ,वर्षेत होती नाह्ली !
गाठ चोळीची कसाया हात मागे गुंतले
त्याचवेळी पावसाने चिंब तिजला भिजविले
हासला निर्लज्ज वरुनि ,ती ही मग रागावली
रागावली ती हे खरे, पण लाजूनी रागावली
भासला कमनीय बांध्याचा  जलद की पातला
निथळवीत पाण्यास जेव्हा देह तिचा वाकला
पावसा , अरेतुझे आभार मी मानू कसे ?
सांग, लघडत्या फळाचे भार मी साहू कसे ?
 
मस्तीतला पाऊस ,बेधुंद वारा आणि समोर ती , मग काय ? ....
भिजण्याची हौस मजला, भिजलो असा कित्येकदा
भिजवणेही प्रिय मजला, मी भिजवले कित्येकदा
इतुकेच की एकाच वेळी एक मजला आवडे
ओलेती तिजला बघावे आपण राहुनी कोरडे 
होते असे भलतेच काही वर्षाऋतुमध्ये बघा
भलतेच कुणी असूनही, भलते घडून जाते बघा
इतक्याचसाठी लाविला ना, हात ओलेत्या तिला
नुसत्या हवेतून मजला झटका परंतु लागला 

पुढे काय ? ......
मी म्हणालो "भिज" ,ती "ना म्हणे भिजेन मी "
मी म्हणालो "भिजू नको" ती म्हणे ,"भिजेन मी"
मी म्हणालो, "भिज तू, वा भिजू नको , लक्षात घे
का राहीले काही असे जे पाहीले नाहीच मी ? 
मित्रहो , आता थोडे वेगळे वळण लागेल .थोडी विश्रांती घेऊ.पण, एक लक्षात असू देत ,

शायरी नुसतीच नाही ,गावया आलो इथे
कोण्यातरी जिंदादीलांच्या दर्शना आलो इथे
दोस्त हो ,मैफिल अपुली रंगण्या जर का हवी
नुसते नको सौजन्य ,तुमची जिंदादिली हवी


सौजन्य -
श्री. भाऊसाहेब पाटणकर.


Wednesday, August 14, 2013

गाई पाण्यावर ...कवी "बी"


गाई  पाण्यावर काय म्हणुनि आल्या |  का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?| उभय पितरांच्या चित्तचोरटीला| कोण माझ्या बोलले गोरटीला ?
उष्ण वारे वाहती नासिकात | गुलाबाला सुकविती काश्मिरात| नंदनातिल हलविती वल्लरीला | कोण माझ्या बोलले छबेलीला ? वरील दोन ओळी  म्हणजे कवीला प्रथम दिसलेली ,कोपरयात एकटीच रडणारी त्याची लाडकी मुलगी .तिच्या दोन्ही डोळ्यातले ओघळणारे अश्रू म्हणजे गंगा आणि यमुना किंवा अबोल ,निरागस गाईंचे मूक आक्रंदन .आजी -आजोबांपासून घरात सर्वांच्या गळ्यातला ताईत असणारी ती गोरीगोमटी ,छबेली लेक आहे.ती अशी धसमुसुं रडताना पाहून काश्मिरातले  गुलाब सुकतात ,नंदन वनातील वेली हलतात . बापाचे काळीज पाझरते. "बाळे,कोण तुला काय बोलले ?"
शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची  | दूड रचलेली चिमुकली मण्यांची |गडे , भूईवर पडे गडबडून| का ग आला उत्पात हा घडून ? विभा-विमला आपटे-प्रधानांच्या | अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या | गौर चैत्रींची तशा सजुनि येती | रेशमाची पोलकी छिटे लेती.|
तुला ’लंकेच्या पार्वती’ समान | पाहुनीया, होवोनि साभिमान|काय त्यातिल बोलली एक कोण|’अहा ! आली ही पहा, भिकारीण!’
मुली असती शाळेतल्या चटोर | एकमेकीला बोलती कठोर|काय बाई , चित्तांत धरायाचे |शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे !
वरील चार ओळीत तिच्या रडण्याचे कारण स्पष्ट होते आहे . तुझ्या अशा रडण्याने आकाशातली सगळी नक्षत्रे खाली कोसळतील आणि जणु  उल्कापात होईल.तु अशी रडू नको . श्रीमंतांच्या कुणी विभा,विमला नावाच्या मैत्रीणीनि तिच्या फाटक्या वस्त्रांची टिंगल करत तिला पार खोलवर डीवचले आहे .पण तू शहाण्यासारखी वाग ,त्यांचे वेडे बोलणे मनावर घेऊ नकोस . इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही -"धनिक आपटे-प्रधान ,त्यांच्या मुली चैत्र गौरी प्रमाणे रेशमी वस्त्रांनी नटून येतात ".कवी त्यांचे वर्णन सुद्धा तितक्याच ममतेने करतो आहे .कुठेच द्वेष,सूड भावना नाही. नाहीतर एखाद्याने किती शिव्या हासडल्या असत्या त्याचा काही नेम नाही! शाळेतल्या मुली अशाच खोडकर असतात ,बाळे त्यांचे मनावर घेऊ नकोस . असा समजूत काढण्याचा प्रयत्न पण आतून मन मात्र फाटून गेलेले . उद्विग्न अवस्थेत मनात चाललेले विमुक्त चिंतन मात्र आपल्याला अंतर्मुख करते ते असे-

रत्‍न सोने मातीत जन्म घेते |राजराजेश्वर निज शिरी धरी ते|कमळ होते पंकांत, तरी येते|वसंतश्री सत्कार करायाते.
पंकसंपर्के कमळ का भिकारी ? धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

बालसरिताविधुवल्लरीसमान | नशीबाची चढतीच तव कमान| नारिरत्‍ने नरवीर असामान्य|याच येती उदयास मुलातून.
भेट गंगायमुनास होय जेथे | सरस्वतिही असणार सहज तेथे | रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे| भाग्य निश्चित असणार ते अपेसे.
नेत्रगोलातुन बालकिरण येती | नाच तेजाचा तव मुखी करीती | पाच माणिक आणखी हिरा मोती | गडे , नेत्रा तव लव न तुळो येती.
लाट उसळोनी जळी खळे व्हावे,| त्यात चंद्राचे चांदणे पडावे | तसे गाली हासता तुझ्या व्हावे | उचंबळुनी लावण्य वर वहावे !

गौरकृष्णादिक वर्ण आणि । त्यांच्या छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या | सवे घेउनि तनुवरी अद्‌भुतांचा |खेळ चाले लघु रंगदेवतेचा !
काय येथे भूषणे भूषवावे | विविध वसने वा अधिक शोभवावे ?| दानसीमा हो जेथ निसर्गाची । काय महती त्या स्थली कृत्रिमाची !
सोने माणिक-रत्ने मातीत जन्म घेतात, राजांच्या मुकुटात शोभतात.कमळ  चिखलात जन्मते पण वसंत त्याचे स्वागत करतो.चिखलात राहून कमळ  भिकारी होते का ?धुळीत राहून रत्न भिकारी होते का ?साध्या दोरयात राहून फुलांचा हार भिकारी होतो का ?मग ,बाळे, माझ्यामुळे तू कशी भिकारी ?नाही असे असणे शक्य नाही कारण मुली तू निसर्गाचे  एक अमूल्य देण आहेस .येथे कृत्रिमतेला वाव नाही . सारी आभूषणे तुझ्या पुढे फिकी पडतील.बाळे, तुझ्या बाल नेत्रांतून येणारी ही सोनेरी किरणे तुझ्या मुखकमलावर बघ कशी अलगद सजत आहेत . माणिक रत्नानाही लाजवत आहेत  . तुझ्या गालावर पडलेली खळी  म्हणजे जणू सागरात उसळणाऱ्या लाटांमुळे जसे  भोवरे निर्माण होतात आणि आहा पहा त्यात जर चांदणे पडले तर किती मनोहर चित्र साकारेल .तुझे हंसू सुद्धा तसेच आहे .अशा अद्‌भुत रंगदेवतेची तू निर्मिती आहेस . गंगा आणि यमुना जिथे असतात तिथे सरस्वती ही असतेच असते .म्हणून मला खात्री आहे की तू रूप-सदगुणी असून तुझा भाग्योदय हा निश्चित आहे तुझ्या नशिबाची कमान  चढती आहे आणि माझ्या पवित्र भूमीने अशी अनेक नारी रत्ने निर्माण केलेली आहेत . हा मनोआलाप  आता पुढील ओळीत एका वेगळ्याच गूढ संवादाच्या पोकळीतल्या गंधारात आपल्याला घेऊन जातो .. 
खरे सारे , पण मूळ महामाया|आदिपुरुषाची कामरूप जाया|पहा नवलाई तिच्या आवडीची|सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.
त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे|प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये |विश्वभूषण सौंदर्यलालसा ही|असे मूळातचि, आज नवी नाही !
नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,|सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध | तोच बीजांकुर धरी तुझा हेतू |विलासाची होशील मोगरी तू !
तपःसिद्धीचा ’समय’ तपस्व्याचा|’भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा |पुण्यवंताचा ’स्वर्ग’ की, कुणाचा,|’मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.
’यशःश्री’ वा ही कुणा महात्म्याची,|’धार’ कोण्या रणधीर कट्यारीची;|दिवसमासे घडवीतसे विधाता|तुला पाहुन वाटते असे चित्ता

तुला घेइन पोलके मखमलीचे|कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे,|हौस बाई , पुरवीन तुझी सारी,|परी आवरि हा प्रलय महाभारी !
ढगे बळकट झाकोनि चंद्रिकेला|तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,|हास्यलहरींनी फोडुनी कपाट|प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !
विश्वंबराची आदीमाया तूच आहेस आणि या युगुल परिणयाचा परिणाम स्वरूप सारे सृष्टी सौंदर्य तुला प्राप्त झाले आहे आणि जिवाला प्राप्त झालेली अंकूरावस्था ही याच युगुलांच्या हौसेतून निर्माण झालेली आहे म्हणून तू मूळमाया साऱ्या  चराचराला व्यापून आहेस तू आजची नाहीसच मुळी.नारायणी ,तुझ्या पुण्य पावलांची लेणी हेच नारी रुपातले तुझे मायावी रूप आहे .म्हणूनच विलासाची सुगंध मॉगरी तू माळशील यात यत्किंचितही शंका नाही .तू कुणी सामान्य नाहीस .तू तपसव्यांचे  तेज आहेस ,सुभग आहेस ,पुण्यस्वरूप स्वर्ग आणि सत्वशील मुकुटमणी आहेस,सर्वशक्तिमान ,यशश्री ती तूच आहेस .तुला घडवताना विधात्याचे हात निरंतर कार्यमग्न आहेत . बलाढ्य ढगांनी चंद्रकलेला झाकून तिचे चांदणे जरी निष्प्रभ केले तरी तुझी हास्यरूपी सूर्य किरणे आकाशात प्रकाशाचे झोत क्षण्मात्रात टाकतील.तेव्हा बाई, हा प्रलय आता आवर .मी घेईन तुला रेशमी पोलके ,सुवर्ण मोत्यांची कुडी ,पूरविन तुझी सगळी हौस.भावमग्न समाधीत गेलेला हा हंस प्रणव ओंकाराच्या पैसातून पुढे अलगद खाली उतरतो .रागातले स्वरालाप आता समेवर येतात ….

प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे|कोड किंचित पुरविता न ये त्यांचे;|तदा बापाचे ह्रदय कसे होते,|न ये वदता, अनुभवि जाणती ते !
माज धनिकाचा पडे फिका साचा|असा माझा अभिमान गरीबाचा|प्राप्त होता परि हे असे प्रसंग|ह्रदय होते हदरोनिया दुभंग !
देव देतो सद्‌गुणी बालकांना|काय म्हणुनी आम्हास करंट्याना ?|लांब त्याच्या गावास जाउनीया|गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !
"गावि जातो," ऐकता त्याच काली|पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !गळा घालुनि करपाश रेशमाचा|वदे "येते मी" पोर अज्ञवाचा !
प्राणप्रिय अपत्यांचे लाड न पुरविता येणारा मी अभागी बाप आहे आणि देव तरी अशा सुंदर सद्गुणी बालकांना आम्हा करन्ट्यांच्या पोटी जन्माला का घालतो ?नाही हे त्याच्या गावी जाउन त्याला विचारतोच."गावाचे नाव " मात्र ,लेक निरागस आनंदात पित्याला गळा रेशीम मिठी घालते . जणू (आदी )मायेचा पाशच …

विट्ठल नावाचा "बॉय फ्रेंड "

पंढरीची वारी , म्हणाव तर परंपरा ,म्हणाव तर श्रद्धा ,म्हणाव तर भक्ती.आज या वारीत केवळ वारकरीच नव्हे तर सर्व थरातील लोक सामील झालेले दिसतात.त्यात ज्याप्रमाणे अशिक्षित गावाकडचा समाज असतो त्याचप्रमाणे सुशिक्षित ,पदवीधर लोक सुद्धा सामील झालेले दिसतात .कदाचित यातून सामाजिक एकात्मतेची भावना दिसत असेल ,तरुण मंडळींचा "फिटनेस फंडा"सुद्धा असू शकेल ,राजकारण्यांची (पापभिरु?) वृत्ती तर वर्तमान पत्रातून येतच असते .पण या सर्वांमधून एक अतिशय नाजुकसा ,निरागस ,भाबडा भाव मात्र वर वर पाहणाराच्या नजरेतुन निसटून जातो .हा भाव कोणता याचे उत्तर सापडते ते वारीत वर्षानुवर्षे येणारया ग्रामीण ,खेडवळ स्त्री-पुरुषयांत .दोन-तीन महिने गावोगावी थांबत थांबत ही मंडळी  ज्ञानोबा- माउली- तुकाराम चा  गजर   करत चन्द्रभागेच्यातीरी जमतात .विट्ठल मूर्तीचे दर्शन तर दुरापास्त असते तरीही चार चार किलोमीटर रांगेत उभी राहतात .काहीजण नुसतेच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेउन परततात .आषाढी  कर्तिकेतला विट्ठल हा देव नसतोच तो असतो एक जिवलग,सखा , "बॉय फ्रेंड " म्हणा ना .डोक्यावर तुळशीचे रोप डोक्यावर घेऊन वारीतल्या बायका जातात ते ह्या "बॉय फ्रेंड" ला भेटायला .
तुळशी बाईशी त्यांची अशी गम्मत चाललेली असावी -"तुळशी बाई ग ,तुळशी बाई ..अस कस तुझ जिन? वरसा-वरसाला ,पांडुरंगाशी लगीन ?"
पांडुरंगाला त्या विचारत असतील -"पांडुरंगा सांग तुझ जनीशी काय नात ?"
अणि पांडुरग उत्तर देत असेल-" कुणी पाखरू काल राती वस्तीला आल हूत"
जनी पण काय कमी नाही ती तर सरळच म्हणते  -"पांडुरंगा कमरेवर का हात बुवा ? पितांबर सुटलाय वाटत ?"
मीराबाई ,सखुबाई , बहिणाबाई सारयानाच या जिवलगाला भेटण्याची ओढ लागलेली होती अगदी आपल्या नवरोबांना न जुमानता!.
आपल्या संस्कृतीत बहुतेक सर्वच देवांच्या हातात काही ना काही शस्त्र हे आहेच.शंकारकडे त्रिशूळ , नारायणाकड़े चक्र, मारुती कडे गदा ,रामाकडे धनुष्य तर गणपतीकडे परशू पण हा विट्ठल मात्र उभा आहे तो नुसताच कमरेवर हात ठेऊन .जेवढी ओढ़ त्याच्या प्रियाधरांना आहे तेवढीच याला सुद्धा  म्हणूनच येथल्या प्रत्येक संताने विट्ठालाशी संबंध जोडला तो एक बाई म्हणूनच.तुकाराम महाराज म्हणतात "कन्या सासुर्यशी जाई,मागे परतोनी पाही " .ज्ञानेश्वर महाराज म्हणतात "तुम्ही गातसा सुस्वरे ,एयकोनि द्यावे उत्तरे , कोकिळे वर्जावे तुम्ही बाईयांनो ".हीच तर "मधुरा भक्ती".कोण्या एका महाराजांनी म्हणे अशाच "मधुरा भक्तीत " व्रत म्हणून हातात बांगड्या आणि अंगात पातळ नेसून विट्ठ्लाला भजले होते .असो.
राधेची तर वार्ताच नको .अनया गवळी (राधेचा नवरा)बाहेर गेला असताना राधा बाळ मुकुंदाला घरी आणते त्याला स्तनपान करते .त्याचे ते मेघश्यामल रूप पाहून त्याच्यावर भाळते सुद्धा.तिचा रतीभाव पाहून कृष्ण तरुण रूप धारण करतो आणि तितक्यात अनया गवळी येतो।राधेची त्रेधातिरपीट होते ती कृष्णाला हात जोडते .कृष्ण मिश्किल पणे हसत परत बाळ होतो.ग्रेस ने एका कवितेत म्हटले आहे "राधेच्या पदराखाली तो कृष्ण नागडा होता " .आपण उगाच ग्रेसला दुर्बोध म्हणतो .कृष्णाच्या नागडेपणाचे हे रहस्य कदाचित या ओळीत अपेक्षित असेल.
तर असा हा विट्ठल आषाढात अशा अनेक मायाबायंशी रमलेला असतो .अशी प्रेमाची भेट घेऊन जेव्हा त्या घरी परत येतात तेव्हा कुणी विचारलेच तर सांगतात - "पंढरीला जाउन काय केल? चंद्रभागेमधे देहभान उजळल" .किती उद्दात्त भावना !देह ही कुडी, सावळे चैतन्य परब्रह्म त्यात नसेल तर त्याचा काय उपयोग ?पण तोपर्यंत तरी हे भांड निर्मळ ठेवायला हव.!
इरावती बाईंना त्यांचा जावई जेव्हा विचारतो की काय आलीस का तुझ्या "बॉय फ्रेंडला" भेटून तेव्हा ही विदुषी हसून लगेच म्हणते "होय रे बाबा"

Saturday, July 20, 2013

भावस्मरण

इंदिरा संत , मराठी सारस्वताला लाभलेल एक अपूर्व रत्न.बाईंची कर्मभूमी बेळगावातली.अतिशय शालीन ,मृदु आणि प्रेमळ व्यक्तिमत्व.बेळगावात त्या सर्वांना "आक्का" म्हणूनच परिचित होत्या.मानेभोवती पदर, मऊ सुती छापील पातळ आणि नेहमी प्रसन्न वदन असे व्यवधान.साधी राहणी आणि कुणालाही मदत करण्याची वृत्ती .शारदेच रूप बहुदा असच असाव .बाईंच साहित्य जितक समृद्ध होत त्याहीपेक्षा दुखी व्यक्तिगत आयुष्य होत.पण त्याची पुसटशी छायाही त्यांनी आपल्या कलाकृतीत पडू दिली नाही.त्या अवघ्या दहा वर्षांच्या असताना वडील गेले.काकांच्या धाकात त्या मोठया झाल्या.आयुष्याला थोडे गोंडस वळण लागल जेव्हा पुण्याच्या फर्गुसन विद्यापीठात शिकताना ना.मा.संतांशी ओळख झाली.विद्यापीठाच्या निसर्गरम्य आवारात जमलेले प्रेम पुढे विवाहात रुपांतरीत झाल .पुढची दहा एक वर्ष त्यांच्या जीवनातील हा काळ  आत्यंतिक समाधान आणि सर्वच बाबतीत सृजनाचा काळ  होता.पण नियतीच्या मनात काही वेगळेच होत.अल्पश्या आजाराचे कारण होऊन ना मा संत अचानक गेले.पदरात तीन पिल्लांना सांभाळत बाईंनी त्यांना वाढवल.नोकरी आणि टेकडीच्या पायथ्याशी असलेल घर यांच्यामधील पायवाट यात त्यांचे दिवस जात राहिले.याच पायवाटेच्या दुतर्फा असलेल्या सुंदर माळरानात त्यांना कविता स्फुरल्या पण त्या नुसत्याच कविता नव्हत्या तर त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर "पोळून निघालेल्या संघर्षमय व्यक्तिमत्वाच्या ठिणग्या" होत्या.पण रसिकांना त्यात कधी दाहकता दिसली नाही पण एक विदेही ,शालीन आणि करूणामय लयबद्ध आर्तता मात्र सतत जाणवली.ही किमया होण्यास कारण बाईंचा पिंडच मुळी सुकुमार कोमलतेचा गाभा होता.
नुकतीच बाईंची १०० वी जयंती  होऊन गेली त्यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण ,बुद्धिपूर्वक सादर प्रणाम.

रक्‍तामध्ये ओढ मातिची, मनास मातीचे ताजेपण
मातीतुन मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन

कोसळताना वर्षा अविरत स्‍नान समाधी मध्ये डुबावे
दंवात भिजल्या प्राजक्‍तापरी ओल्या शरदामधि निथळावे

हेमंताचा ओढुन शेला हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कचभार तिच्यावर
जर्द विजेचा मत्‍त केवडा तिरकस माळावा वेणीवर

आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरि तुजला ध्यावे तुजला ध्यावे

Monday, July 15, 2013

होड्या

ती खूप आवडत असते .अगदी मनाच्या तळापासून.उमेदवारीचे वय.मनात असलेली प्रेमाची हुरहुर.तिच्या सगळ्या गोष्टी,आवडीनिवडी ठाउक आहेत फक्त एका गोष्टीचा पडताळा व्हायचाय.जमायच आहे कोणी प्रियवंदान्च्या घरी, काही कार्यक्रमाच्या निमित्ताने.तिथे घडलेय हे सगळ् .तिथेच उलगडलय एक कटू सत्य.मनात चाललेली घालमेल मांडली जातेय "मला ना पुष्कळ होड्या येतात ...." .ती येते. कशी ? गाडी चालवत हे माहित करून घेतल जात कारण तिच्याकडेच आहे ना सगळ् लक्ष.ती येते तेव्हा तो पाहतोय तिच्याकडे, अगदी बारीक ,तिरक्या नजरेने.ती आपल्याच मस्तीत खूप बडबडी इथूनच सुरवात होतेय त्या कटू सत्याची .थोडा अचंबा .ती बोलत नाही त्याच्याशी .त्यालाही  आवडत नाही तिने लाडावून जवळ घेतलेल्या "डॉगी"ला.मनातली घालमेल चालूच आहे.लौकिक अर्थाने त्याला जावई करून घेण्याला कोणीच विरोध करू शकत नाही कारण तस व्यगुण्य नाही त्याच्यात.म्हणून तर मुलीचा बाप दोनदा विचारतोय आणि तो ही तेच उत्तर देतोय .पण ....पण त्याला सत्य कळतय. तिच्या मनातल समजतय. काहीतरी मन मोडणार. .म्हणून तर तो नकार देतोय दुसर्यांदा दिल्या जाण्यारा फरसाणाला आणि तोही "तिच्याकडून".सोपस्करास्तव निरोप. आता कटू सत्य समजल्य.मनातली घालमेल थांबलीय .आता  नाही कसलाच विचार करायचाय म्हणून तर तो म्हणतोय -
पाऊस ना,पडलाच नाही
पाणी ना,वाह्यलचं नाही
होड्या ना,सोडल्याच नाहीत
होड्या ना,केल्याच नाहीत.

पण....




मला पुष्कळ होड्या येतात
बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी

बिट्टू कधीतरी म्हणत होता
तो नेहमीच काहीतरी म्हणतो म्हणा,
कॊफी तर सगळेच प्यायलो,
ती चालवत आली होती म्हणे गाडी

बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

बोलण तर बोलायच असतं,
सगळेच काय काय बोलत होते,
माझ्याशी नाही पण तीही चिकार बडबडली,
पुष्कळजण होते, मी बोललोच नाही काही.

बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

चिंकू कुत्रा गोडीत होता:
ऒव-यॊव, इकडे धाव-तिकडे धाव
तिच्याशी तर फारच गोडीत होता,
तीही भलतीच गोडीत होती.

बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

दास अंकलनी मला विचारला
पहिलाच प्रश्न दुस-या वेळेला
मी सांगितलं म्हणा दोनदा
पण ती म्हणाली,"पपा,तुम्ही कमालच करता,"

बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

कॊफी तर तिनच दिली
तेव्हा मी नि गंधेकाका चेस खेळत होतो,
फरसाणसुध्दा तिनच आणला:
एकदा घेतल,दुस-यांदा नाही म्हणालो

बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

दारापर्यंत सगळेच गेलो,
तीही म्हणाली,"बराय अंकल,बराय ऒटीं
टाटा बिट्टू, टाटा चिंकू’
नंतर म्हणालीच नाही काही

बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

पाऊस ना,पडलाच नाही
पाणी ना,वाह्यलचं नाही
होड्या ना,सोडल्याच नाहीत
होड्या ना,केल्याच नाहीत.

पण मला पुष्कळ होड्या येतात
बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

जिना

असा जीना प्रत्येकाला कधी ना कधीतरी भेटलेला असतो .पण हा काळ थोडा जुना म्हणजे साधारण ३०-३५ वर्षापूर्वीचा आहे.घरे छोटी दोन वा तीन मझली.लिफ्टची गरज नसायची.ये जा जिन्यावरुनच.जिन्यात काहीसा उजेड काहीसा अंधार.कवी मनाला मग आठवतात काही अलवार कोमल आठवणी ,अंधारातले थोडे धडपडणे,चोरून चोरून केलेल्या काही हरकती ज्याना छतावरची पाल साक्ष आहे.कवीला मग त्या नागमोडी वळणाचे गमक कळते.त्याला तो इतका आवडतो आहे की स्वर्गाच्या सोपानाला ही असे नागमोडी जीन्याचे वळण असावे अशी त्याची इच्छा आहे..
कळले आता घराघरांतुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला

जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडपड

मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशीक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी

जिना असावा असाच अंधा
कधि न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधि न करावी चहाडखोरी

मी तर म्हणतों- स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे


- वसंत बापट