Tuesday, March 22, 2016

शब्द

मुक्ते,
हल्ली माणसं बोलत नाहीत , "चॅट" करतात.
दररोज शब्दांच्या शेकडो पत्रावली(पत्रावळी नव्हे) इकडून तिकडे पाठवल्या जातात.
बिच्यारे शब्द ,किती ससेहोलपट सहन करतात नाही?
शब्द निर्माण झाले त्याच प्रयोजन भावना पोहचवणे एवढच नसावा इथपर्यंत शब्दांची व्याप्ती वाढलेली आहे 
कि शब्दांना वेठीस धरल जातयं माहीत नाही.
कधी कधी मात्र बोलण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही.
अशी चमकू नको ! 
हे बघ, अंगणात येणा-या चिमण्यांची चिवचिव , 
एखादं निरागस बाळ तुमच्याकडे पाहून वेगळयाच भाषेत हसते तो क्षण, 
तुम्ही वळचणीखाली उभे असताना डोके थेंबाथेंबाने भिजवणा-या पागोळ्या, 
जिवलग मित्र-मैत्रीणींची झालेली गळाभेट,
दूरवरच्या रानातली झ-यांची झुळझुळ....अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे शब्दाविण संवाद होतो.

या संदर्भात आरती प्रभुंची एक सुरेख ओळ आठवते -
" अर्थ चिमणे चिमणे...शब्द मादी
(बाकी सर्व)
बोलती मिनिटे मिनिटा ...विसंवादी"
आता मिनिटांचे सेकंद झाले आहेत इतकचं !
अशा चिमण्या चिमण्या अर्थानांच शब्दांची प्रसवता लाभते बाकी सगळा विसंवाद असतो.

"शब्दांच्या नकळत येती ...शब्दांच्या ओठा गाणी
शब्दांच्या नकळत येती .. ...शब्दांच्या डोळा पाणी
शब्दांना नसते दु:ख .. शब्दांना सुखही नसते
ते वाहतात जे ओझे ..ते तुमचे माझे असते "

Wednesday, March 16, 2016

सोबत

***  लेखकाचे नाव माहीत नाही पण जरूर वाचावे असे काही


आजकाल कुणाशीही बोलावंसं वाटत नाही. खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहेरे. 

ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना, की नको वाटतं....!

इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात ? 

ह्यात "आपले लोक" पण असतात हे विशेष!

ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका "नकाराने" बदललेले बघितले आणि वाटलं, 'आपण एकटे असतो तेच बरं असतं.'

ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदांमध्ये रमावं, मन प्रसन्न रहातं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता...

कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. 

त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.

प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना

 "स्वतःला काय हवं आहे?"

हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आणि इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.

मग अशा वेळी प्रश्न पडतो 

"हे सगळं कशासाठी ?"

खूप विचार केला की ह्या प्रश्नाचं एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे -

 "आपण एकटेपणाला घाबरतो."

सुरक्षतेसाठी कळपात राहीलं पाहिजे ही एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. 

एकटे पडू ह्या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. 

मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण "सोबत", "मैत्री" ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो. 

लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला "सोबत" अस गोंडस नाव देतो....

आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोसा होतो. 

मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो.

जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

'मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन,' असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. 

मोजकीच, पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी-

"सोबत"...!

माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायचं असतं. 

गोतावळ्यात राहूनही आपण एकटेच असतो त्यापेक्षा थोडसं ह्या सगळ्यांपासून लांब जाऊन बघावं. खूप मनःशांती मिळते. 

असा एक ब्रेक घेतला की आयुष्यातील सोबतीचं वर्तुळ नव्याने आखण्याची गरज आहे हे लक्षात येते... 

थोडेच पण मनापासून आपले असलेले सोबती असावेत.

आणि सोबत छंदांची जोड....

Friday, March 11, 2016

सूत्र

"जिवलगा ,अजूनही तू मृत्यू मानतोस?" तू हादरलास.

माझ्या प्रश्राने तुझा थरकाप उडाला.सारी परिमाणे गळून पडली.
सर्व सीमा संपून गेल्या.चढाओढ संपून गेली आणि सारे शब्द थांबून गेले.
तू निष्प्रश्न आणि निरूत्तर झालास.आपण दोघेही सा-या श्रेणी , सा-या पाय-या ओलांडून पलीकडे गेलो.
आता आपल्या दोघांमध्ये कुणी लहान कुणी मोठ उरल नाही.तू "तू" उरला नाहीस मी "मी" उरले नाही.
जवळ आणि दूर काही उरले नाही.आपल्याला सूत्र सापडले होते-स्वतःची खेळणी स्वतःच मोडून टाकण्याचे.


"मेघांत अडकले रंग । कुणाचा संग ।
मिळविती पेशी? ।
चढशील वाट? । रक्तात घाट ।
पलिकडे चंन्द्र अविनाशी ।।"

कविता

ऐकलसं काय गो कुंदा ,काय झाला एकदा
दिदि आमची चिरात व्हती खसा खसा कांदा

कांद्यान आपला काम केल्यान डोळ्यात इला पाणी
दिदि रडली ढसा ढसा कांदो कापल्यान भसा भसा

आये करवादली गो मेले लवकरदी कांदो
पावणे बघूक येवचे हत बेगींदा तयार हो

इतक्यात इलो नामगो म्हणत "चल्ला गे काय?"
पावणे येव्न बसले हत घरी हाडू काय?"

दिदि आमची गुणाची मउसाजूक मनाची
सुरसुरल्या नाकान विळो घेव्न पळाली

बघान तिची घाय आमका इला हसू
नामग्या वायंज थांब तेंका दे बसू

थोड्या येळान दिदी ब्ह्रयार आली नटून
पन गोरो चेहरो झालो लाल रडरडरडून 

कांद्यान वांदो केल्यान पन दिदी छान दिसली
कांदे-पोहे खावून पावन्यांनी पसंती कळवली

ऐकलसं काय गो कुंदा ,काय झाला एकदा
दिदि आमची चिरात व्हती खसा खसा कांदा.....

Thursday, March 10, 2016

सुखाच्या पलीकडे

मुक्ते,
ज्याला वास्तव अर्थाने आपण सुख म्हणतो ,त्यात नेहमीच माणूस सुखी होतो असे नाही.
पण दु:खाच्या पलीकडे जसं एक सुख असतं ,तसच सुखाच्याही पलीकडंच एक सुख असतं.
दु:खाच्या पलीकडच्या सुखाने दु:खांचा परिहार होण्याची शक्यता असते.
पण ,सुखाच्या पलीकडच्या सुखात सुख आणि दु:ख दोन्ही सामावून घेतलेली असतातं.

"पार्वतीच्या पायाखाली
भडकली आग
जटेतली गंगा गेली
तिच्या मागोमाग

चंद्रकोर सुनी सुनी
गंगेसाठी झुरे
कोण कोणासाठी मरे?
कोण कोणासाठी उरे?"

हा उखाणा सोडव ,उत्तर सापडेल !

Sunday, March 6, 2016

आज जाने की जिद न करो


मुक्ते ,
ही सरगम पार वेडी असते.रोज मला खारीप्रमाणे खुणावत राहते,
जवळ गेलो कि लाजते आणि दूर पळून जाते.
आणि मग 'शब्दाविण संवादू' असा आमचा खेळ चालत राहतो.
कधी मी झोपलेला असताना अचानक काहीतरी कानात गुणगुणते आणि मला जाग आणते.
तिच्या मागुन धावता धावता माझी पुरती दमछाक होते.
मी दमलो की कदचित तिला माझी दया येत असावी कारण आता ती बोलक्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत बसते. 
हळूहळू काही ऐकू येते मला.अंधाराचा गंधार होतो आणि त्या अमर्याद पोकऴीत मी हरवून जातो.
अगणित अलंकार एखाद्या प्रपाताप्रमाणे कोसळतात माझ्यावर ,
आणि मग ही खारूबाई हसत सुटते आणि म्हणते- 

"आज जाने की जिद न करो
यू ही पहलू मे बैठे रहो 
हाय ,मर जायेंगे ,हम तो लूट जायेंगे
ऐसी बाते किया न करो
आज जाने की जिद न करो..."

धन्य बाई तुझी !!

भींगरूटी


मुक्ते,

श्रीचक्रधरांचा एक छान दृष्टांत आहे-

भींगरूटी असे : ते किटकीतें पाहे :
धरी : कांटा रोवी :
नेऊनि आपुलेया घरांतु घाली : दार लिंपौनी जाए :
'एउनि मागुती माते खाईल ' म्हणौनि
भेणे तीएतें चींती :
चिंतीत चिंतीतां तीसीहि पाख नीगति :
तेही तीएसारीखी होए ।।

अर्थ - 
गांधीलमाशी कीटकीस दंश करून आपल्या घरात कोंडून ठेवते. गांधीलमाशी आपल्याला खाणार या भीतीने कीटकीस तिचे सतत स्मरण होते.तिच्या या चिंतेनेच तिला पंख फुटतात व ती गांधीलमाशीचे रूप धारण करते.

अद्वैत-द्वैताचा हा खेळ म्हणावा ? मला वाटत काहीच म्हणू नये.फक्त पाहवं.तात्पर्य -
"मोर हवा तर आपणचं मोर व्हायचं.जे जे हवं ते ते आपणंच व्हायचं "