Wednesday, December 30, 2015

पांडगावकर सर ...

Wednesday, December 23, 2015

तडजोड

"तडजोड" 
शब्द तसा फारच बोजड आहे.
अगदीच फोड करायची झाली तर "तड्यांना जोडण्यांचा प्रयत्न म्हणजे तडजोड" 
असा काहीसा करावा लागेल.काचेप्रमाणे फुटकळ स्वभावाची माणसे कधीच जुळत नाहीत ,
प्रयत्न केलात तर जखमाच होण्याची शक्यता जास्त.
पण काहीं जणांची मने मात्र पाण्याप्रमाणे समंजस असतात ,
इथे तड्यांचे तरंग होतात तेही क्षणभरच नंतर मात्र अखंड पाणीच,
 फक्त गारवाच देणारं.आयुष्याच्या प्रवासात तडजोडी सुद्धा पाण्यासारख्या असाव्यात 
,इतरांचे वेगळेपण स्वीकारत ,समजून घेउन 

हळूहळू एकमेकांसारख होउन जाणा-या !

संवेदना

संवाद हरवलाय. 
सर्वाना 'आनंदयात्रा' हवी ,"
आनंदयोग" मात्र कुणालाच नको.
गाणी हवी , सूर नको आणि सूरातली कट्यार तर नकोच नको.

"मनमंदिरा ,तेजाने उजळून घेई ,साधका।
संवेदना ,"संवादे" सह"वेदना" जपताना।।"

अहो , वेदनेला पाहूनच जिथे सगळे पळपूटे पळून जातात ,
 तिथे कसला आलाय "सह"वास-संवाद ?
पण "आनंदयोगाची" कट्यार हवी असेल,
 तर ही बंदिश टोचून घेण्याची क्षमता हवी तरच स्वयंप्रकाश मिळेल ,काजव्यांसारखा!

आठवांची तंद्री

मुक्ते ,
थोड ऐक.माझ्या निजेला धक्का ही न लावता रोज तू येऊन जातेस ,
पण मग पदरातही मावणारं नाहीत इतके घुंगरू जवळ का बरे घेतेस?
आणि प्रत्येक घुंगुराच्या इवल्याला नादुकलीला आठवांची तंद्री मात्र जोडून जातेस !
अगं ,समोर जेवणा-या माणसाच्या घासात अश्रू पडले की दुस-या माणसाच्या
तोंडातील अन्नाचा घास गोठलेल्या रक्ताचा होतो ! मिस्टीक "poetry" म्हणजे दुसरे तरी काय असते ?
पण आज मला खोदायचेच आहे एक लाल तळे;
ज्याच्या काठावर असेल एक महावृक्ष जो साक्ष देईल बुद्धाच्या चेह-यावरच्या गूढ हास्याचा !
आणि त्या तळ्यात प्रतिध्वनित होतील अमृतानुभव

" धर्मात सुखम् । न सुखात सुखम् ।।"

आपण सातरंगी छटांना पाण्यात मिसळून टाकत डूंबून जाऊ पण
बुडून जाताना जर एकदम उघडलेच डोळे तर मात्र हातानेच मोजायचे -

"तीन कप पाणी
आणि सहा चमचे साखरं"

हसलीस ?.........

गुणगुण

मुक्ते ,
ज्या घरात माणसं गुणगुणत नाहीत ,मोकळ्या ह्रदयानं हसत नाहीत आणि पोटभर रडतही नाहीत ,
ते घर मला कळू शकत नाही.तेव्हाही समजलं नाही आणि आताही नाही.
सूर्य पकडावा इतकी कुवत कुणाचीच नसते पण तेजोमयतेच दर्शन घेण्याइतपत तर असतेच असते.
तरीही माणसे घुबडांसारखी का वागतात?
अगं ,सूर्य मावळताना नजरेआड होत असला तरी नाहीसा झालेला असतो कां?
असे कितीतरी खेळ निसर्ग आपल्यासमोर करत असताना माणूस मात्र अहंतेच्या पलीकडे काहीच कसे पाहू शकत नाही?

हसलीस ? छान.

पण ,आपण आपला प्रवास चालू ठेवू,
शेवट नसलेल्या शेवटाकडचा....

आणि हो, तुझी गुणगुण मात्र चालू ठेव ,निराकारातून साकार होण्याची !!

Friday, November 27, 2015

प्रीत हवी तर

तिने हळूच विचारले "करतोस ना रे प्रेम माझ्यावर?".तो फक्त हसला ,मनात म्हणाला "होय ,अगदी जिवापाड".तिही हसली ,पुढे म्हणाली "देशील का मला चांदणमाळ ,या दीपोत्सवात गळाभर मिरवायला.एक शुक्रकोर कपाळी लावायला?आणि हो ,नक्षत्रफुलांची पैठणी ,अंगभर सजायला?"
त्याचे आभाळच भरून आले.सप्त रंगात न्हाउन निघाले.क्षणांतराच्या वाटेवर नागमोडी वळणे घेत त्याचे मन एका दूरच्या नदीकिनारी जाऊन पोहोचले.

तो म्हणाला ,"देईन गं तुला जे हवे ते,नक्की देईन " पण एक विचारू ?"

प्रीत हवी तर उगा कशाला पाळाया जनरीत हवी?
प्रीत हवी तर दोन जिवांना अपुलाली नयनीत हवी !
प्रीत हवी तर हवेत अश्रु विरहाचा अंगार हवा
प्रीत हवी तर माथ्यावरती अभिन्नतेचा भार हवा !
प्रीत हवी तर नेत्रांपुढती प्रलयघनांचे चित्र हवे 
प्रीत हवी तर मनी नि ध्यानी नि:श्चळ ध्रुवनक्षत्र हवे !
प्रीत हवी तर व्यथेव्यथेतही रसरंगांची साथ हवी
प्रीत हवी तर उरांत केवळ प्रीतीवरली प्रीत हवी !

मंजूर ? तर हात पुढे कर ...

आता दोघही हसली ,अगदी मनमोकळ ...रानोमाळ!

Thursday, November 19, 2015

सीता

इतकं रामायण ऐकून वर विचारतोस 'सीता रामाची कोण?'
वर वर पाहता ही म्हण तशी अडाण्यांची टिंगल करणारी.
पण तस पाहीलं तर फार मोठा अर्थ आहे त्यात.
पृथ्वीच्या पोटातल्या लेकरांना आई-बाप असतात कुठे ?
मातीच त्यांच जन्मस्थान नि मृत्यूस्थान.
अशोकवनात रामाची मुद्रिका स्वीकारताना सीता हनुमानाला विचारते "राम कसा आहे?"
 मारूती म्हणतो "तो सुखरूप आहे पण सुखी नाही" 
लगेच सीता म्हणते "वानरा ,हे तू विषाने भरलेले अमृतच देतो आहेस मला.
रामाच मन माझ्याशिवाय अन्य कुणावरही नाही नि तो दु:खी आहे.हेच ते विषाने भरलेले अमृत."
वियोगिनी सीता दु:खी आहे.रामासाठी झुरते आहे.
पण तरी रामात विरघळलेली नाही.रामच सीतामय झाला आहे.
वेडा होऊन वृक्षलतांना तिचा ठावठीकाणा विचारतो आहे!
पुढे जेव्हा सीता भूमीत गडप झाली ,तेव्हा राम हळहळला.दीन झाला.
सीता क्रृद्ध झाली नाही.दीन तर नाहीच नाही.
एका मर्यादेनंतर अस्तित्वाला शोभा नाही हे तिनं ओळखल आणि दैवाने तिला साथ दिली.
आपल प्रेम मनात भरून ,रामाकडे बघत ती रामासमोर भूमीच्या उदरात नाहीशी झाली.
मीलनापेक्षा प्रेमाने भरलेला विरहच तिने सुशोभित केला.
रामाची पत्नी रामाची राहीली नाही.भूमीची मुलगी भुमिमय झाली.ती राममय झाली नाही.
खरचं आहे , "सीता रामाची कोण होती?"

'तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शूनी गेला ।
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला ।।

Thursday, September 24, 2015

कविता


विजेचे फुलं






नाती

काही नाती अशी असतात की त्यांना कशानेही तोलता येत नाही ,मोजता येत नाही.
त्यांची गुढताच इतकी अफाट असते की एकदा आत शिरल्यावर तुम्ही रस्ता विसरुन जाता 
आणि चकवा लागल्यागत भिरभिरत राहता.
आणि हे हरवणे अगदी हरखुन जाण्यासारखे असते.
देवाघरची माणसे देवाकडे लवकर निघून जातात.
कधी कधी ओळींनीही निघून जातात.आपण राहतो मागे भग्न देवळातल्या पुजा-यासारखे.
त्यांच्या आनंदनिधानांशी असलेले तुमचे नाते हे देखील असेच अनाकलनीय.
अशा आभासमोगरी सुवासाच्या आठवणी जाग्या झाल्या की कल्पनेने दु:खाचे संध्यावस्त्र पांघरून नाहीसे व्हावे -एका चिमुकल्या बाळमुठीत.कारण बालकांनी केलेल्या प्रार्थना देवाजवळ हमखास जावून पोहचतात.


" Baby knows all manners of wise words ,though few on earth can understand 
their meaning.It is not for nothing that he never wants to speak.
The one thing he wants is to learn mother's words from mother's lips.
That is why he is so innocent"

कविता


Tuesday, September 22, 2015

आकांताचे जगणे

माणसाने रूढार्थी असणे हेच बरे.परंपरेविरूध्द जाणे सगळ्यानांच जमत नाही आणि तशी काही अटही नसते, नसावी.
अनुभवसिध्द तुकाराम सांगतो -
"ओंकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।।
अकार तो ब्रम्हा ,ऊकार तो विष्णू । मकार महेश जाणियेला ।।
ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न । तो हा गजानन मायबाप ।।"
पण पुराणेषुपरंपरा कुणाला कुणाचा बाप बनवेल काय सांगावे? असो.
आकांताचे जगणे कुणाच्याही वाट्याला येवू शकते ,येतेही पण तुकारामासारखा एखादाच त्यातला गूढार्थ जाणू शकतो.पण काहींना मात्र ह्या निळाईचे वेड लागते ,नियतीच्या ह्या जीवघेण्या खेळाचा नाद जडतो.मग -
'पुन्हा पुन्हा मरण । घरी दारी बाहेर ...शयनी । सर्व ठिकणी ' याखेरीज गती उरत नाही.
अशा अवस्थेत जगण्या-याचा एका निराळ्या अर्थाने शुभाशुभाचा किनारा फिटत असतो.त्याच्या लेखी मंगल -अमंगलाची लेबले ,रद्द केलेल्या नोंटासारखी कवडीमोल झालेली असतात.-सारेच निरपेक्ष होते ! सा-याच भासचक्राचा भेद होतो अन् उमजू लागते-
"सावल्यांच्या पल्याड असा एक देश 
जिथला वेष नको उतरायला ,चढवायला"
किंवा ..
" हा प्रश्न जिवाला छळतो
टिचलेले बिल्वर हसती
कोणत्या फुलातून गळते
कोणत्या फुलाची माती?"

चेहरा

प्रत्येक चेह-यात एक आभा असते ,मनातल्या किरणांची -अभाव-विभावांची ,कट-विकटांची ,सुख-दु:खांची.
आणि तोच तर खरा चेहरा असतो.एरवी माणसे मुखवटे पांघरून स्वतःलाच फसवत असतात.
पण काय नवल? माणसाला दोन अवयवांचे प्रत्यक्ष दर्शन घडत नाही ,चेह-याचे नि पाठीचे.
म्हणजे माणूस स्वत:पुरता बिनचेह-याचा असतो.अनुभवाने अलिप्त असतो.
आरश्यात जरी तो पाहता आला तरीही ते प्रतिबिंबच असते आणि काठावर पाणी पिताना सिंह जसा त्याला दुसरा सिंह समजून त्यावर झडप घालून स्वतःचीच फसवणूक करतो तेच आपणही करत असतो.
फरक एवढाच की श्वापद निष्पाप असते आणि आपण हुशार असतो.
या आत्मप्रतिबिंबाच्या मोहातून बाहेर पडणारे फारच विरळे.असो.
एखाद्या ज्ञानेश्वरालाच हे कसे काय गवसते ?-

"दर्पणी पहाता रूप न दिसे वो आपुले ।
बाप रखुमादेवीवरू मज ऐसे केले ।।"

कथुली


Tuesday, September 8, 2015

पुनवेचा चंद्रम